नागपुरातील विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील 'संसद शांती मार्च'ला दिला पाठिंबा! N7 News Voice
पेपरफुटीविरोधात नागपुरात संविधान चौकात जनआक्रोश;
दिल्लीतील 'संसद शांती मार्च'ला दिला पाठिंबा!
![]() |
| संविधान चौक, नागपूर |
नागपूर,ता.२० : देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा घोटाळा आणि सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात आज नागपुरातील ऐतिहासिक संविधान चौकात हजारो विद्यार्थी आणि तरुणांचा प्रचंड जनआक्रोश पाहायला मिळाला. दिल्लीत 'जंतर-मंतर' ते 'संसद' दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य 'शांती मार्च'ला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागपुरातील तरुणाई आक्रमकपणे रस्त्यावर उतरली.
"देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पेपर फोडण्यात धर्मेंद्र!" आणि "विश्वगुरू = पेपरफोडू!" अशा धगधगत्या घोषणांनी संपूर्ण संविधान चौक परिसर दुमदुमून गेला होता. हातात तिरंगा, जय भीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांची चित्रे आणि निषेधाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली.
दिल्लीतील आंदोलनाचे नागपुरात पडसाद
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी २१ दिवसांचे उपोषण केले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची धुरा सांभाळत आज काढलेल्या 'संसद शांती मार्च'चे नेतृत्व केले. दिल्लीतील याच लढ्याला बळ देण्यासाठी नागपुरात विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठा एल्गार पुकारला.
"पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वर्षांची मेहनत मातीमोल होत आहे," असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. NEET घोटाळ्याची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाईसह पारदर्शक परीक्षा पद्धत लागू होईपर्यंत हा लढा राज्यभरात असाच तीव्र राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला.


No comments