नागपूरात सर्वात मोठा लाकडी बैल
नागपूर शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यंदा लाकडी बैलांच्या ( तान्हा ) पोळ्यास २१२ वर्ष पूर्ण होत आहेत.
भारत हा कृषी प्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केल्या जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही. सन १८०६ मध्ये श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोसले यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून त्यांनी लाकडी बैल ( तान्हा ) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैला प्रमाणे त्या बैलांना प्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले आंब्याचे तोरण लावून त्याला जिलबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे,अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत मार्गे हनुमानाचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे,वाटण्यात यायचे. फक्त विदर्भात या प्रथेला २१२ वर्षे पूर्ण होत आहे. राजे मुधोजीराव भोसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे.आज सुद्धा एवढा मोठा बैल भोसले घराण्याकडे आहे. मुधोजी राजे चे निवासस्थान सीनियर भोसले पॅलेस, महाल,नागपूर येथे हा बैल बघता येईल. या लाकडी बैलांची उंची आठ फूट लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोमवार १० सप्टेंबर रोजी सायं, ४ वाजता मोठ्या थाटात सीनियर भोसला पॅलेस येथून निघून महाल भागात फिरून परत सीनियर भोसला पॅलेस येथे मुलांना खाऊ,पैसे,वाटून समाप्त होईल. काही मंडळात वाड्यातील बैल गेल्याशिवाय पोळा साजरा केला जात नाही.म्हणून वाड्यातील मिरवणूक आटोपल्यानंतर वाड्यातील बैल त्या ठराविक मंडळात आजही जातात हा त्या बैलाचा मान आहे. आजही सुद्धा ही प्रथा श्रीमंत राजे भोसले यांनी नियमीत ठेवली व यापुढेही सुद्धा ही प्रथा चालू राहील असे मत महाराजांनी प्रसिद्धीप्रमुख यांच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे.
No comments