Breaking News

'डॉ. भाऊ लोखंडेच्या वेदनां पलीकडील विश्व् ! ' : आचार्य सुधाकर चौधरी


डॉ. भाऊ लोखंडे
डॉ. भाऊ लोखंडेची  'दफन विधी' आज आम्हाला प्रेरणा देत आहे.  आज भाऊंचे लेख, त्यांचे  प्रकाशित साहित्य व भाषणे हे  आजच्या पिढीला  प्रेरणा देतात  व प्रबोधन करित  आहेत. भाऊंनी आंबेडकरी चळवळीसाठी जे संपूर्ण आयुष्य अर्पण केले. डॉ. भाऊ लोखंडेना  'उर्दू ' शेर -शायरी आवडत असे कारण उर्दू काव्यात  दोन चार  ओळीत जीवन परिघातील वेदनाचे सम्यक आलेखन सहज करता येते. त्यांच्या प्रत्येक भाषणात उर्दू शायरीला  महत्वाचे  स्थान होते. 


मित्रांनो..!
जन्म  आणि मृत्यू म्हणजे जीवन वर्तुळाच्या केंद्रा पासून परिघा पर्यंत अखंड प्रवास होय. ज्या  केंद्रा पासून निघणाऱ्या त्रिजे वरील प्रत्येक बिंदूतून निर्मित जीवन वर्तुळात सामावलेली एक एक अविस्मरणीय घटना आमच्या जीवन प्रवासात  स्मृती-स्थळ  मागे ठेवून कालचक्रात पुढे सरकत  असतात. 

 २२ सप्टेंबर २०२०, डॉ. भाऊ लोखंडेच्या जिवीत  कायेचे अंतिम वर्तुळ होते. नागवंशीय  बौद्धांच्या  पवित्र भूमित  जरी त्यांचा पार्थिव देह पुरण्यात  आला तरी दफन विधी नंतरही आज भाऊ आमच्या स्मृतित,  त्याचे साहित्य, सभासंमेलनातील  शेर-शायरी युक्त त्याचे प्रभावी भाषण, आंबेडकरी आंदोलनातील विद्यार्थी दशेपासून  केलेली चळवळ, पाली व बोद्ध धम्म क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य, टीव्ही चॅनल व आकाशवाणी वरील त्यांचे कार्यक्रम, अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेत त्यांनी मांडलेले चिंतन, मासिक व वृत्तपत्रातून प्रकाशित लेख या सर्वातून आमच्यात आहेत. 
   त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत  त्यांच्या वेदनांच्या  आठवणींच्या एक जीवनपट आम्ही सर्वांनी यांना  त्या रूपात  जाणला आहे. अनेक थोर-मोठ्यांनी, गुरुजनांनी, मित्र आणि शत्रूंनी हि श्रद्धांजली देण्याच्या  निमित्ताने त्यांच्या कार्याचा 'आपल्याल्या परीने' गौरव केला आहे. 
      परंतु त्यांच्या वेदनांच्या परिघा पलीकडे हि त्यांचे  एक विश्व् होते ज्यातील संवेदना ते आपल्या जिवलगांशी  ' शेअर ' करीत असत. त्यांची माझी मैत्री ४०-४५ वर्षा  पासून अखंड आहे. मी धम्म शिकवितो, ध्यान शिबीर घेतो  म्हणून ते मला ' गुरुजी ' म्हणून संबोधित असत.     

 मृत्यू पूर्वी चार दिवसा आधी अंदाजे २० मिनिट आमचा मोबाईल वरून संवाद झाला . या पूर्वी नेहमी आमचे विचाराचे देवाणघेवाण अनेक वर्षा  पासून सुरु होते .माझी  पत्नी प्रभा, मुलगी शिल्पा व मी गमतीने त्यांना  Encyclopedia   ऑफ  डॉ. आंबेडकरस    मुमेंट  म्हणत असू.  ते तीन- चार तास आम्हाला कधी कधी ज्ञान देत असत, प्रबोधन करीत असत. परंतु त्यांच्या प्रबोधनात आम्हाला आंबडेकरी चळवळीतील विघटनांची खंत आणि त्यांच्या दुःख वेदनांचे तरंग सातत्याने जाणवत असत. आपल्या सामाजिक, धार्मिक कार्या करिता  त्यांना आपल्या जिवलगांच्या व आपल्या  परिवाराच्या   वेळेचा   वेळो-वेळी त्याग करावा लागे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्मावरील अस्मित निष्टे मुळे ते आपल्या पर्यंत समाजप्रबोधनच्या  आटोकाट प्रयत्न करीत असतांना इतरांतर्फेच  नव्हे तर आपल्या बांधावा तर्फे,  ज्यांच्या कल्याणासाठी ते झटले, त्यांची ' बेईमानी ' व शत्रू सारखी वागणूक त्याना सहन  होत नसे आणि दुःखी मानाने ते विचारीत असत, ' गुरुजी .! माझ्याशीच  असं  का होत..?
 मी त्याना म्हणत असे , ' भाऊ ! हा त्यांच्या-त्यांच्या संस्कारातून निर्मित वैचारिकतेचा भाग आहे. प्रत्यक्ष सम्यक समबुद्धाला, फुले -आंबेडकरांना नाकारणारे, त्याना भले बुरे  म्हणणारे  लोकही  भारतात आहेत. त्यात आपल्या सारख्या सामान्यांचे  काय. ? आपण मनाला लावून  घेऊ नये कारण ते  त्यांचे विचार व त्यांचे कर्म आहे. सूर्याचा प्रकाश, कुशल कर्म  व सत्य लपविता येत नाही. भारतातून बोद्ध संस्कृतीला हद्दपार करणाऱ्यांना ' बुद्धाचा धम्म ' नष्ट करता आला नाही.  बोधिसत्व बाबासाहेबांच्या एका धम्म दीक्षेने भारतात परत धम्म चेतना निर्माण केली. डॉ. बाबासाहेबद्वारे  संशोधित बोद्ध-धम्म आम्ही ' श्रावक संघा' सारखे घरोघरी लोकां पर्यंत पोहोचवू शकलो  नाही, हे नाकारता येत नाही. भाऊ शांत होत असत.
  
 भाऊ  हसत हसत म्हणत असत , ' गुरुजी ! तुमच्यावरही असे प्रसंग वारंवार येत असतांना  तुम्ही शांतपणे त्यांचा  सामना कसा करता ?
मी  म्हणायचा , भाऊ ! बस धम्म ज्ञान व ध्यान साधना ! 
भाऊ,आचार्य ओशोच्या साहित्याचा, त्यांच्या प्रवचन शैलीचा नेहमी  गौरव  करीत असत. मी त्यांना सहज विचारले ' भाऊ तुम्ही पूज्य सत्यनारायण गोयंकाजी चे ध्यान  शिबीर  कधी केले का ? ' मी १९८२ पासून इगतपुरी  व त्याच्या विभिन्न केंद्रात  " ध्यान  साधने  वरील   माझ्या  संशोधना  करीता जात असतो. गोयंका गुरुजी माझे  'गाईड'  आहेत व ' बरूवाभिक्षु ' मुनींद्रजी कडे मी  " अभिधम्म" शिकत आहे. तुम्ही एकदा गोयंका गुरुजींची भेट  घ्यावी.  एखाद शिबीर करून अनुभवाने  ध्यान साधना जाणावी असे मला वाटते. ' भाऊ राजी झाले व आम्ही दहा दिवसाच्या ध्यान   शिबिरासाठी इगतपुरीला गेलो. 
जेव्हा भाऊ गोयंका गुरुजींना भेटले, तेव्हा  त्यांनी  भाऊचे हसत   मैत्रीपूर्ण   स्वागत केले. भाऊ विषयी गुरुजींना आधी पासून माहित होते. त्यांनी भाऊंना  त्रिपिटकातील ग्रंथाचा हिंदी अनुवाद करण्याची विनंती केली आणि भाऊला व मला  विपस्सना रिसर्च संस्थेद्वारे प्रकाशित पुस्तकांचे खंड असलेले  खोके भेट केली.  ते भाऊंच्या घरी  किंवा युनिव्हर्सिटीत आजही असतील. बौद्ध   धम्म ज्ञान  व ध्यान साधनेने आपल्या  जीवनात  ' सुख - शांती - समृद्धी ' कशी येते हे मी आपल्या स्वअनुभवाने जाणले होते.  

 भाऊ  स्वभावाने  जितके भोळे व निर्मळ  होते, तेवढेच ते तापट  व त्यांना  जे पटले ते पुढील व्यक्तींना तोंडावर सांगणारे होते. असत्या बद्दल त्यांना चिड  होती.  व कधी -कधी  त्यांचा राग अनावर झाला तर ते पुढील व्यक्तीवर तोफ डागण्यास मागेपुढे  पहात नसत. परंतु त्यांच्यात असींम मैत्री भावना हि होती, ते बुद्धिमान होते व कोणतेही विचार ते सहजा-सहजी स्वीकारत नसत . त्यांना जे सत्य  वाटायचे ते ठाम  पणे   मांडायचे त्यामुळे  अनेक विद्वान  कधी कधी  त्यांचे शत्रू हि झाले. परंतु त्यांच्या विषयी  भाऊच्या मनात सदैव  मैत्री  भावना  होती. सामाजिक कल्याणच्या आंतरिक तळमळी मुले ते वेळेपुरते रागात  असायचे. राग ओसरल्यावर ते एखाद शायरी गझलच्या पंक्ती आयकवायचे ज्यात  त्यांच्या दुःखद संवेदनांचा आलेख असायचा. 

 गुणीजन -विद्वान  आणि सामान्य जन भाऊला एक आंबेडकरी, चिंतक , विचारवंत, पाली बोध्द  साहित्यांचे अभ्यासक व भाषण व लिखाण द्वारे प्रबोधनकार, प्रभावी वक्ता म्हणून  ओळखतात  जाणतात परंतु त्यांचे या पलीकडे एक विश्व  होते. ज्यात भाऊंच्या जीवन सागरातील दुःखांचे, पारिवारिक समस्यांचे, मानसिक संघर्षाचे अनेक वादळ आपले घर करून होते ही वादळ त्यांना पीडा देण्या ऐवजी अध्यात्मिक  बनवित  असत. 
ज्या प्रमाणे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पारिवारिक, सामाजिक आणि वयक्तिक  दुःखाना , समस्यांना आपल्या ह्दयाच्या एका काप्यात  साठवून आपल्या दुःख वेदना , अपमानाला एका शक्तीत रूपांतरित करून आपले संपूर्ण आयुष्य दुःखित-पीडित मानवासाठी अर्पित केले, त्यांच प्रमाणे त्यांचे निष्ठावंत  अनुयायी   भाऊंनी  आपले समग्र जीवन या समाजाच्या वेदना व त्यांचे वेदनेच्या  - परीघा  पलीकडील  विश्व् साकार करण्यात व्यक्त केले.    

विद्वानात, अभ्यासकांत वैचारिक मतभेद हि चिंतन-प्रक्रियेची एक महत्वाची कडी आहे. भाऊंच्या जीवनात त्यांचे डॉ. यशवंत मनोहर, डॉ. प्रदीप आगलावे, स्वामी संदेश भालेकर, मा. रा. सु. गवई , मा.प्रकाश आंबेडकर, मा.विमलकीर्ती  सारख्या अनेक विचारक  व मनुवादी लेखक,  राज्यकते  व  त्यांचे  आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या  व्यक्तीशी वैचारिक मतभेद होते. परंतु  त्यांच्या वैचारिक  मतभेदाच्या मागे त्यांची आंबेडकरी चळवळी बद्दल तळमळ व मैत्री भावना असायची. 

तथागत, प्रतित्य समुत्पाद  स्पष्ट  करतांना  भिक्षूंना सांगतात " भिक्षुनो ! दुःख आहे हे मान्य  केल्यावर त्या दुःखाची कारण असतात हे आपण जाणू शकतो.  अविद्या आमच्या दुःखाचे मूळ कारण आहे व त्याचा बोध झाला तर दुःख मुक्तीचा मार्ग , अष्टांग मार्ग आहे हे कळत.  बिना  कारणा  शिवाय  काही घडत नाही.  अज्ञातांमुळे  आम्हाला त्या कारणांचा  बोध होत नाही व ती कारण दूर न केल्यामुळे  आमच्या वाट्याला दुःख येत असतात. 

 डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांनी  भारतातील बहुजन समाजात  मनुवाद्यांनी वैमनस्य कसे निर्माण केले व गुलाम  बनविले. यास तथागताच्या मार्गाने ते कसे दूर करता येईल हे  आपल्या दीर्घकाळ संशोधित ग्रंथा द्वारे  इतके स्पष्ट  केल्यावरही या बहुजन  समजाला व  मनुवाद्यांना न कळल्यामुळे १५ टक्के लोक ७५ टक्के लोकांवर त्याच्यातील वैमनस्यामुळे  कसे अमानुष राज्य करीत आहेत, यावर भाऊंशी माझी तास-नि-तास चर्चा व्हायची. मा. कांशीरामजी आमचे गुरु होते. त्यांनी बामसेफच्या माध्यमातून  राजसत्ता आपल्या  हाती  येई पर्यंत  केलेल्या  नियोजना  बद्दल   चळवळीची आम्ही चर्चा व चिंतन   करीत  असू. बामसेफ, बीएसपी, च्या विघटना  नंरतही मा. वामन मेश्राम, यांनी बामसेफ चळवळ  संपूर्ण  भारतात कशी टिकवून ठेवली व  कॅडर्स तयार  करण्याचे फायदे  यावर आमचे चिंतन चालत असे . यात भाऊ अत्यंत इमोशनल होत असत व आमच्या आर. पी. आय ची आजची दशा आणि दिशा चुकीच्या मार्गाने जाऊ नये  यावर भाऊ आपले विचार माझ्याशी 'शेअर' करताना त्यांचा गळा दाटून येई. 

मिलिंद फुलझले  व सुनील खोब्रागडे यांनी चालविलेल्या जनतेच्या महानायक वृपत्रावर आम्ही नेहमी चर्चा करायचे ज्याचा प्रत्येक अंक, त्यातील संपादकीय व लेखाचे जतन करून त्याचे पुस्तक रूपाने प्रकाशन करावे या संबधी मी  मा. मिलिंद फुलझले व मा. खोब्रागडे  यांच्याशी वारंवार संवाद केला. भाऊंची देखील तीच तळमळ होती. व अशी मनस्वी इच्छा होती की, नागपुरात मिलिंद  फुलझलेच्या परिश्रमाने  सुरु असलेल्या जनतेचा महानायक हे दैनिक वृत्तपत्र आमच्या लोकांच्याच नव्हे तर इतरांच्याही घोरोघरी कसा पोहोचेल ? यावर  आमची  चर्चा व्हायची आणि त्या संबंधी मिलिंद भाऊ व सुनील भाऊ शी  फोनवरून संवाद हि करायचे. 

 डॉ. भाऊ लोखंडेच्या मृत्यपूर्वी जेव्हा आम्हाला कळलं की, हे दैनिक महानायक वृत्तपत्र बंद होणार आहे तेव्हा भाऊंना अत्यंत वाईट वाटले व ते म्हणाले गुरुजी ! आता तुम्ही तुमच्या पातळीवर सुनील आणि मिलिंद बरोबर संवाद करा. आणि मी तसा प्रयत्नही केला पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणी मुळे  ' जनतेचा महानायक नागपुरात बंद  होणारच हे कळले  भाऊ लोखंडे अत्यंत दुःखी झाले. त्यात त्यांची समाज प्रबोधनाची तळमळ होती. 
  डॉ. भाऊ लोखंडेच्या मृत्यू नंतर  जेव्हा मिलिंद फुलझलेनी  काही आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी आणाऱ्या  लोकांच्या  मदतीने ' बहुजन सौरभ'  दैनिक वृत्तपत्राची सुरु करण्याची संपूर्ण तयारी केली. त्याच्या उदघाटन कर्यक्रमास मला मैत्री देण्यासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आमच्याच नव्हे तर आमचे ओबीसी, मुस्लिम, ख्रिचन बांधवाना समाज प्रबोधनाची दारे परत  उघडण्याच्या आंनदी सोहळा पाहण्यास स्मृतिशेष डॉ. भाऊ लोखंडे हजर नव्हते याचे दुःख जि आम्ही उरी बाळगले.  जनतेचा महानायक दैनिक परत सुरु करण्यात  सुनील भाऊंनी  त्यांच्या परिने  प्रयत्न  करावा त्यास आमचे सहकार्य राहील. 

 भाऊंच्या मृत्यनंतर, मी २३ तारखेला सकाळी सह  पत्नी भाऊंच्या घरी गेलो. भाऊंच्या सुविद्य पत्नी, मुलगी  पिंकी व मुलांशी संवाद झाला. त्यांच्या  घराचे आंगण, बैठक पाहून भाऊंशी तास-न-तास आपणाशी चर्चा संवाद करायचे, याचे चलचित्र डोळयांपुढे सरकत होते. 

माझ्या कडे सकाळी ध्यान केंद्रात विद्यार्थी, इतर  लोक घ्यान करावयास येत असत . त्यांच्या पैकी एकाने विद्यार्थिनीस फोन  वर विचारलेल्या प्रश्नाने लेखाची रचना झाली आणि निलेश राऊत रिपोर्टर यांच्या आग्रहाने  भाऊंना श्रद्धांजली देण्यास, हा लेख त्वरीत मी लिहिला.  मनुवादी संस्कार हजार-बाराशे वर्षांपासून आम्हा भारतीयांच्या मनात मृत्यू , आत्मा, परमात्मा, पुर्नजन्म  आणि कर्म या संबधी संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी आहेत. 
  फोनवर माझ्या विद्यार्थिनीने एक प्रश्न विचारल सर ! मृत्यूनंतर भाऊ कुठे असतील ? काय त्यांचा पुर्नजन्म होईल? आणि मृत्यू नंतर नेमके काय होते. 
  तिचा प्रश्न  आम्हा शिकलेल्यानाच नव्हे तर विद्वान व अडाण्याच्याही मनात घर करून बसला आहे. संभ्रमातून निर्माण झालेल्या या प्रश्नाचे उत्तर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी  ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या अनमोल ग्रंथात चतुर्थ खंड, भाग२ मध्ये सम्यक समबुद्धाच्या मार्गाचा आधार दिला आहे. ते थोडक्यात जाणून घेत, समजून घेतले तर मनुवादी निर्माण केलेले  संभ्रम विज्ञानाच्या कसोटीवर दूर होऊ शकतात. 
 त्याचा संसेप  असा ,मांडता येईल ---
१ . मृत्यू नंतर काय ?
२. काय बुद्ध शाश्वत वाद  किंवा उच्छेदवादी होते ? 
३. जर आत्मा अमर आहे, या शाश्वत वादावर बुद्धाचा विश्वास नव्हता आणि जगात सर्व नश्वरवादी  आहे सर्व    शेवटी संपूर्ण नष्ट होत म्हणजे  उच्छेदवादी  पण बुद्ध नव्हते तर मृत्यू नंतर  नेमके काय होते ?
४. काय बुद्धाचा आत्मा व पुर्नजन्मावर विश्वास होता ? नव्हता तर त्यांची  या संबधी ' देसना ' काय होती.?
५. बुद्धाच्या मते कशाचा व कुणाचा पुनर्जन्म  होतो आणि मनुष्य मारतो म्हणजे नेमके काय होते.?

मित्रानो ! प्रथम बाबासाहेब सांगतात की, बुद्धाचा मृत्यू आणि पुर्नजन्मा  संबधी विचार ' विज्ञानाशी ' सुसंगत आहे. 
  मनुष्याचे शरीर पृथ्वी, जल , वायू , अग्नी  या चार तत्वांनी बनले आहे. आणि मृत्यूनंतर हि चार तत्वे  आसमंतात विचरणाऱ्या , विद्यमान असणाऱ्या, समान तत्वांशी एकरूप होतात. समान तत्वात विलीन होतात. कायेतील  ऊर्जा विश्वात विद्यमान असलेल्या ऊर्जा पिंडात जावून  विलीन होते व त्यात वृद्धी करते. मनुष्य जेव्हा  मरतो तेव्हा शरीर उष्णता निर्माण करणे बंद करते  व हि ऊर्जा विद्यमान ऊर्जा पिंडात    विलीन होते. डॉ.भाऊ लोखंडेचे हि असेच झाले. 
मित्रानो ! आत्मा नाही आणि  ऊर्जा विद्यमान ऊर्जेत विलीन होते तर मग बुद्धाच्या मते कुणाचा पुर्नजन्म होतो.? असा प्रश्न आपल्या पुढे येतो. 
बाबासाहेब म्हणतात - जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याच माणसाचे चार तत्व जेव्हा परत एकत्र आले तर त्याच माणसाचा पुर्नर जन्म होतो. परंतु त्याच माणसाचे चारही तत्व परत एके ठिकाणी येणे असंभव असले तरी अत्यंत  कठीण व दुर्लभ आहे. कारण अनेक व्यक्ती निरंतर मरत असतात व अनेक व्यक्तीच्या चार तत्वांनी जेव्हा  एखादे शरीर परत निर्माण होत असेल तर त्याला त्या व्यक्तीचा पुर्नजन्म  म्हणता येत नाही. तो फक्त एका नवीन व्यक्तीचा जन्म असतो. 
   अर्थात तथागताच्या मते ज्या चार तत्वांनी काया  बनते त्या तत्वांचा  पुर्नजन्म होतो आणि जर त्या एकच व्यक्तीच्या नसतील तर तो त्या व्यक्तीच्या पुर्नजन्म नाही. 
विज्ञानाच्या अक्षयतेचा  नियम म्हणतो की , ऊर्जा नष्ट होत  नाही  रूपांतरण होते. Energy cannot be destroyed but it is transfered one  form to another   
   मनुष्याचे शरिर  जेव्हा मरते  तेव्हा  शरीर उष्णता निर्माण करणे बंद करते व हि चेतना -ऊर्जा विश्वात विद्यमान असलेल्या ऊर्जा पिंडात जावून विलीन होते. त्यामुळे असा कुणी आत्मा नसतो कि ज्याच्या पुर्नजन्म होईल.  तथागताच्या या विज्ञान सुसंगत देसनेने  बौद्ध संस्कृतीत एखादी  व्यक्ती मेली तर तिला मातीत  दफन करण्याची, पुरवण्याची प्रथा प्रचलित  होती. बौद्ध संस्कृतीतुन उदयास आलेली, ख्रिश्चन, मुस्लिम संस्कृतीने  आजपर्यंत  मृत्य व्यक्तीला दफन  करण्याची प्रथा सुरु ठेवली आहे. 
 मनुवादी विचारधारेने  तयार झालेल्या बौद्धांनी मृताला अग्नी देण्याची प्रथा स्वीकारली आणि रक्षा नदीत विसर्जन करून विखरुन  टाकण्याची प्रथा स्वीकारली मृत व्यक्तीच्या चार तत्वांचा विचार तेथे नाही. तसेच अग्नी दहन संसस्कारामुळे  झाडे तोडून लाकड वापरण्यात येते त्यामुळे वृक्षांनी साकारलेली नैसर्गिक संतुलनाचा हि घात होतो. 
   डॉ. भाऊ लोखंडे यांचा मृत देह त्यांच्या इच्छेप्रमाणे जाळण्या ऐवजी दफन करण्यात आला. भाऊंनी आपल्या वैचारितेने, प्रत्यक्ष कृतीतून ' दफन ' संस्काराचे प्रबोधन, मेल्यावरही केले आहे.. 
     तथागतांचा अग्नी संस्कार व काहीचा अग्नी संस्कार याला अपवाद आहे. त्यांची वेगळी कारणे आहेत. माझ्या चौधरी  पूर्वजाचा अत्यसंस्कार  ' दफन ' क्रियेने पार पडला कारण माझे पूर्वज हे  नागवंशीय बौद्ध संस्कृतीचे होते. माझ्या  बहिणीच्या मनुवादी विचारामुळे माझ्या आईचा संस्कार अग्नी संस्कार झाला. हे  मी अनुभवाने जाणतो. 
     डॉ. भाऊ लोखंडेची  'दफन विधी' आज आम्हाला प्रेरणा देत आहे. आज भाऊंचे लेख , त्यांचे  प्रकाशित साहित्य व भाषणे हे  आजच्या पिढीला  प्रेरणा देतात  व प्रबोधन करित  आहेत.  गुणीजनांनी  एकत्र येऊन ते प्रकाशित करणायचा विचार केल्यास  त्यांचे  पुत्र यास अवश्य सहकार्य देतील यात शंका नाही आणि भाऊंनी आंबेडकरी चळवळीसाठी जे संपूर्ण आयुष्य अर्पण केले त्यांच्या  श्रमणातून आपण अंशतः  का होईना मुक्त होऊ. 
स्मृतिशेष डॉ. भाऊ लोखंडेना  'उर्दू ' शेर -शायरी आवडत असे कारण उर्दू काव्यात  दोन चार  ओळीत जीवन परिघातील वेदनाचे सम्यक आलेखन सहज करता येते. त्यांच्या प्रत्येक भाषणात उर्दू शायरीला  महत्वाचे  स्थान होते. भाऊंच्या करुणामय हृदयाचे चित्रण या चार काव्य ओळींत देवून मी भाऊंना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. 

दर्द  हि दर्द  भर गया दिल मे,
 इतना एहसास  कर दिया, गमने
 जब किसी  आँखो से गिरा  आँसू ,
अपनी  आँखो मे ले लिया हमने '   
सर्वांचे मंगल हो... !


चिंतन - लेखक  : आचार्य सुधाकर चौधरी 
मो. ९८५०३४१७०५ 
 
 ' डॉ. भाऊ लोखंडेच्या वेदना पलीकडील विश्व् !' कसा वाटला या विषयी आपले प्रतिक्रिया द्यायला विसरू नका, आवडला असेल तर  लाईक आणि शेर करण्याला विसरू नका.
 
By : Acharya Sudharkar Choudhary
Director buddhist International Cultural Education & meditation  Research Council of India, Nagpur 
(M) 9850341705

No comments