जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वेरोनिकाने गवसले यश
जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वेरोनिकाने गवसले यश
नागपूर,ता.१ : नूकताच ICSE बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालाने अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा दिली. नागपूरमधील मेरी पौसिपींस शाळेची विद्यार्थिनी वेरोनिका राहुल वासनिक हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने तब्बल ९५.६० टक्के गुण मिळवून प्राविण्य यादीत आपले स्थान निश्चित केले.
वेरोनिकाच्या या नेत्रदीपक यशाची गोष्ट अधिक प्रेरणादायी आहे, कारण तिने कुठल्याही शिकवणी वर्गाची मदत न घेता हे यश संपादन केले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात, जिथे अ
नेक विद्यार्थी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी शिकवणी वर्गांवर अवलंबून असतात, तिथे वेरोनिकाने केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आणि स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून हे शिखर गाठले आहे.
आपल्या यशाचे श्रेय वेरोनिकाने आपल्या आजीला दिले आहे, ज्या तिच्या जीवनातील प्रेरणास्रोत आहेत. आजीच्या संस्कारांमुळे आणि मार्गदर्शनामुळे तिला योग्य दिशा मिळाली, हे ती कृतज्ञतेने सांगते. यासोबतच, शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन तिच्या यशात मोलाचे ठरले.
वेरोनिकाचा यशाचा मंत्र अगदी साधा आणि प्रभावी आहे. ती म्हणते, "स्वतःवर विश्वास आणि अभ्यासामध्ये सातत्य असेल तर यश हमखास मिळतेच." तिचे हे शब्द आजच्या तरुण पिढीसाठी एक महत्त्वाचा संदेश आहेत. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि नियमितपणे प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे, हे वेरोनिकाने आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेच्या अगदी दोन दिवस आधी वेरोनिकाला खूप ताप आला होता. अशा परिस्थितीतही तिने हार न मानता, आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर परीक्षेला सामोरे गेली आणि उत्तम यश मिळवले. तिची ही जिद्द आणि चिकाटी खरोखरच कौतुकास्पद आहे.
वेरोनिका केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर भविष्यातही देशाची सेवा करण्याचे स्वप्न बाळगते. तिला सिव्हिल सर्विसेसच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे आहे. तिच्या या उदात्त विचारांना आणि ध्येयांना निश्चितच यश मिळेल, यात शंका नाही.
कु. वेरोनिका राहुल वासनिक हिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. तिच्या जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि कठोर परिश्रमाला आमचा सलाम! भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
No comments