टाटा एसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; नारा घाट येथे आज होणार अंत्यसंस्कार : N7 News Voice
टाटा एसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; नारा घाट येथे आज होणार अंत्यसंस्कार
नागपूर: शहरात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा मैदान परिसरात ही घटना घडली. शुभम परमानंद जनबंधू (वय ३२, गौतम नगर मेकोसाबाग, जरीपटका ) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शुभम हे त्यांचे नातेवाईक गौरव अनिल उईके (वय २६, रा.समतानगर, पापडवली गल्ली ) यांच्यासोबत 'स्प्लेंडर' दुचाकीने जात होते. नारा मैदान परिसरातून जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव टाटा एस (Tata Ace) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
या धडकेमुळे शुभम आणि गौरव दोन्ही दुचाकीवरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती शुभम जनबंधू यांना मृत घोषित केले. दुचाकी चालक गौरव उईके यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
जखमी गौरव उईके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी टाटा एस वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत शुभम जनबंधू यांच्या पार्थिवावर आज दिनांक ४ फेब्रुवारीला नारा घाट येथे दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे कुटुंबीय उमेश जनबंधू यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

No comments