बुद्धाची करुणा जगाला वाचवू शकतेः डॉ. नितीन राऊत
शांतता व सामाजिक सौहार्दला धर्मांधतेचा धोका असल्याने फक्त बुद्धाची करुणा जगाला वाचवू शकतेः डॉ. नितीन राऊत
नागपुर,ता.१५ : "धर्मांधता आणि कट्टरवादामुळे समाजातील शांतता व सौहार्दाला तडे जात आहेत. अशावेळी बुद्धाची करुणा जगात शांतता प्रस्थापित करू शकते, म्हणूनच आता जगाला बुद्धाच्या शिकवणीची नितांत आवश्यकता आहे, असे उदगार नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ब्रह्मविहार या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
ब्रह्मविहार या बुद्धाच्या शिकवणीमध्ये चार सद्गुणांचे वर्णन केले आहे. जर लोकांनी हे सद्गुण आत्मसात केले तर समाजात शांतता व सौहार्द निर्माण होईल. सध्या जगात सगळीकडे अशांतता व हिंसाचार माजलेला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सगळीकडे असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले असुन बुद्धाची शिकवण आपल्याला यातून मार्ग काढण्यासाठी मदत करू शकते, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
बुद्ध धम्म व आंबेडकरवाद हे मानवतावादी तत्वज्ञान आहे. त्यामुळे मानवजातीचे कल्याण करण्यासाठी व लोकशाही समाज निर्माण करण्यासाठी या तत्वज्ञानाची गरज आहे. सांप्रदायिकता, जातीयवाद व संकुचित विचारधारेमुळे जगापुढे आव्हाने निर्माण झाली आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे असेही म्हणाले की, 'अत्तदीप भव' ही बुद्धाची शिकवण असून प्रत्येकांनी आपला मार्ग स्वतःच निवडला पाहिजे. यासाठी आपण सदैव जागृत असले पाहिजे व स्वतःचे चित्त शुद्ध केले पाहिजे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शुद्ध करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धत्व असून प्रत्येक व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त होऊ शकते. प्रत्येक माणूस जन्माने समान असून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.
डॉ. आंबेडकरांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केल्यामुळे आपण त्यांचे फार ऋणी आहोत. त्रिपिटक यात बुध्द धम्माचे नियम व तत्व असून ते फार व्यापक व प्रचंड आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध व त्याचा धम्म हे पुस्तक सामान्य माणसांना धम्म समजावे म्हणून लिहिले असून याचा धम्म समजून घेतांना खूप मदत होते. त्यामुळे आपण सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे, असे मत डॉ राऊत यांनी व्यक्त केले.
बुद्धानी देव, आत्मा व मोक्ष याचे अस्तित्व नाकारले आहे. मानव जातीचे कल्याण याच गोष्टीवर बुद्ध धम्म आधारलेला आहे. जीवनात दुःख आहे आणि ते दूर करण्याचा मार्ग बुध्दानी सांगितला आहे. चित्ताची शुद्धी करून व मनाला शांत करून हे आपल्याला साध्य करता येते, असे ते म्हणाले.
विधानपरिषदेचे माजी आमदार आणि पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. मधुकर वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. मुख्य भाषण हे प्रा. डॉ.संघसेनसिंग यांनी नवी दिल्ली येथून केले. भंते आनंद, सरचिटणीस महाबोधि सोसायटी, बेंगलोर, आणि म्यानमारमधील भन्ते सेंग मुरंग आचारिया हे प्रमुख व्यक्ती होते. पालीभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर, प्राचार्य डॉ. यशवंत पाटील आणि डॉ. सुदेश भोवटे हे वेबिनारचे संयोजक होते. डॉ. महेंद्र गायकवाड, कु. प्रणोती सहारे, सल्लागार सुरेश पाटील, सिद्धार्थ वाणी आणि डॉ जयंत जांभूळकर हे सहसंयोजक होते. या वेबिनारमध्ये जगभरातील विद्वान सहभागी झाले होते. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालयाच्या वतीने ह्या एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
No comments