कोरोना परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा : पालकमंत्री अनिल देशमुख
बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे.असे निर्देश गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
गोंदिया, ता. ३ : (जिमाका) बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे.असे निर्देश गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
आज ३ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना आयोजित बैठकीत श्री देशमुख बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधि,पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती
श्री देशमुख पुढे म्हणाले, बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची सखोल चौकशी करावी. त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात यावी. यासाठी आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाने विशेष दक्षता घेऊन हे काम करावे. ग्रामीण आणि शहरी भागात सर्वे करणाऱ्या चमूने नागरिकांची माहिती घेतांना इतर आजाराबाबतची माहिती घ्यावी.कोणताही कोरोनाची लक्षणे असणारा व्यक्ती आढळल्यास ताबडतोब आरोग्य यंत्रणेला कळवावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही असे सांगून श्री देशमुख म्हणाले,कंटेनमेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे.बाहेर पडतांना सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे.नाक व तोंडाला मास्क लावावा. विषाणू नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करून श्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील गावात आणि शहरात बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ बलकवडे म्हणाल्या,बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात ४४ हजार व्यक्ती दाखल झाले आहेत. जिल्ह्यात २१ कोरोना क्रियाशील रुग्ण आहे. २३ कंटेनमेंट झोन असून यामध्ये शहरी भागात तीन आणि ग्रामीण भागात वीस कंटेंटमेंट झोनचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४८ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. संस्थात्मक अलगीकरणात ३२०५ तर गृह अलगीकरणात २७०७ व्यक्ती आहेत.
जिल्ह्यात १२ कोविड केअर सेंटर असून त्याची बेड क्षमता १२८६ इतकी आहे.सद्यस्थितीत या सेंटरमध्ये ३३७ व्यक्ती उपचार घेत असून जिल्ह्यात क्षयरोग व उच्च रक्तदाब रुग्णांची व गरोदर महिलांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ.बलकवडे यांनी यावेळी दिली.
बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे,प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांची उपस्थिती होती.
No comments